लाईफस्टाईल

Age Of Moon : चंद्र झालाय ‘इतक्या’ अब्ज वर्षांचा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Age Of Moon : चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. आता चंद्राच्या वयाबाबत देखील नवीन दावा करण्यात आला आहे. आपल्या चंद्राचे वय किमान ४ अब्ज ४६ कोटी वर्षे इतके असू शकते.

अर्थात चंद्राचे वय हे ज्ञात वयापेक्षा चार कोटी वर्षे अधिक असल्याचा दावा नवीन अभ्यासातून करण्यात आला आहे.

चार अब्ज वर्षांहूनही आधी सौरमंडळ नवीन असताना आपली पृथ्वी मोठी होत होती. त्यावेळी मंगळ ग्रहाच्या आकाराची एक महाकाय खगोलीय वस्तू पृथ्वीवर धडकली. या शक्तिशाली धडकेतून पृथ्वीपासून एक तुकडा वेगळा होऊन आपला चंद्र बनला.

मात्र या घटनेच्या वेळेबाबतचे रहस्य अद्याप कायम आहे. पण नवीन अभ्यासातून आता चंद्राच्या वयावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. यासाठी १९७२ साली अपोलो अंतराळवीरांनी चंद्रावरून आणलेल्या ‘क्रिस्टल’चा वापर केला आहे.

हे क्रिस्टल सर्वात जुने ठोस पुरावे आहेत. शक्तिशाली टक्कर झाल्यानंतर या क्रिस्टलची निर्मिती झाली होती. त्यामुळे चंद्राचे वय उलगडण्यात हे पुरावे महत्त्वपूर्ण ठरतात, असा दावा अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधनाचे वरिष्ठ लेखक फिलीप हेक यांनी केला आहे.

अंतराळवीरांनी आणलेल्या चंद्रावरील धुळीकणामध्ये अतिसूक्ष्म ‘क्रिस्टल’ आहेत. याच्या अभ्यासाद्वारे आपला चंद्र ज्ञात वयापेक्षा चार कोटी वर्षे जुना असल्याचे आढळल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

यासंबंधीचे सविस्तर संशोधन ‘जियोकेमिकल पर्सपेक्टिव्ह लेटर्स’ नामक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office