असे म्हणतात की, माणसाचे नशीब कधी बदलू शकेल हे कोणीही सांगू शकत नाही. एका रात्रीत रावाचा रंक आणि रंकाचा राव होऊ शकतो, हे आपण आजवर अनेकदा पाहिले आहे. काही माणसे जन्मजात श्रीमंत असतात, तर काही अचानक दैवयोगाने श्रीमंत बनतात; पण त्यांची ती परिस्थिती नेहमीच कायम राहील, याचा भरवसा नसतो.
असाच एक किस्सा ब्रिटनमधील एका व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती एकेकाळी तब्बल ६८ कोटी रुपयांची लॉटरी लागल्यामुळे श्रीमंत बनली होती; पण सध्या हा माणूस पुन्हा रस्त्यावर म्हणजे पूर्वपदावर आला आहे. एकेकाळी करोडपती बनलेला हा माणूस सध्या कंगाल झाला आहे.
रयान असे या व्यक्तीचे नाव आहे. रयानला सन १९९५ मध्ये ६.५ दशलक्ष पाऊंड म्हणजे सुमारे ६८ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. तोवर गरिबीमध्ये जगणाऱ्या रानला एवढ्या पैशांचे करायचे काय, असा प्रश्न पडला होता.
त्यामुळे तो श्रीमंती आयुष्य जगू लागला. त्याने स्वतःसाठी एक हेलिकॉप्टर, एक आलिशान बंगला खरेदी केला होता. खाण्यापिण्यावर तो अतोनात पैसे खर्च करू लागला होता; पण त्याच्या या ऐयाषीमुळे तो हळूहळू कंगाल होत गेला. वाढता खर्च भागवण्यासाठी आणि श्रीमंतांसारखे आयुष्य जगण्यासाठी त्याने एक एक करून आपल्या सर्व काही गोष्टी विकून टाकल्या.
आज हाच रयान लंडनमधील झोपडपट्टीमध्ये राहू लागला आहे. उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो रंगारी म्हणून काम करू लागला आहे. गंमतीचा भाग म्हणजे त्याचा असा विश्वास आहे की, तो पुन्हा एकदा बंपर लॉटरी जिंकेल.