Snake Species:- असे म्हटले जाते की पृथ्वीवर जे काही सर्वात प्राचीन सजीव निर्माण झाले त्यापैकी साप एक आहेत. सापांची जी काही जीवन पद्धती आहे ती पर्यावरणाशी जुळवून घेणारी असल्यामुळे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून आहे.
संपूर्ण पृथ्वीतलाचा विचार केला तर फक्त ध्रुवीय प्रदेश सोडून संबंध पृथ्वीवर सापांचे अस्तित्व आढळून येते. जगभरामध्ये तीन हजार पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती असून त्यातील 275 पेक्षा अधिक प्रकारचे साप भारतात आढळून येतात.
या 275 पैकी फक्त 52 प्रजाती विषारी या प्रकारामध्ये येतात. सापांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शीत रक्ताचे प्राणी असल्यामुळे ते अतिशय थंड वातावरण किंवा अतिशय गरम हवामान सहन करू शकत नाही. साधारणपणे आठ अंश सेल्सिअस ते 45 अंश सेंटीग्रेड तापमान त्यांना जगण्यासाठी उत्तम असते. तसेच सापांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जे काही अन्न खातात ते अन्न शरीराचे तापमान टिकवण्यासाठी वापरले जात नसल्यामुळे साप अन्नाशिवाय देखील अनेक दिवस जगतात.
अशाप्रकारे जर आपण पाहिले तर सापांच्या बाबतीत अनेक आश्चर्यकारक अशी माहिती आपल्याला वाचायला किंवा बघायला मिळते. या अनुषंगाने आपण सापाचे जे काही प्रकार पाहतो त्यामध्ये विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार आपल्याला माहिती आहेत. परंतु यामध्ये निमविषारी हा देखील एक प्रकार येतो. नेमके सापांच्या प्रजातींपैकी कुठल्या प्रजाती या निमविषारी या प्रकारात येतात याबद्दलची माहिती घेऊ.
निमविषारी सापाचे प्रकार
1- हरणटोळ- हरणटोळ या सापाला तण साप किंवा वेल्या साप असे देखील म्हटले जाते. हा साप लांबीला एक ते सात फुटापर्यंत असतो व त्याचा रंग पोपटी हिरवा, डोके लांब व चिंचोळे तसेच नाजूक असते. या सापाची डोळ्यांची बाहुली आडवी असते व रंग पिवळा असतो.
या सापाचे विषाचे दात वरच्या जबड्याच्या मागच्या बाजूस असतात. या जातीचा साप कुठल्याही झाडाझुडपांवर आणि वेलींवर मोठ्या प्रमाणावर आढळतो व हिरवा रंग असल्यामुळे तो सहसा वेल किंवा झाडाझुडपांवर राहिला तर आपल्याला दिसून येत नाही. जर हरणटोळ जातीचा साप चवताळला तर तो त्याचे शरीर फुगवतो व जबडा वासतो. याचे विष सौम्य असल्यामुळे मानवास हा अपायकारक नाही.
2- मांजऱ्या साप- हा साप निशाचर प्रवृत्तीचा म्हणजेच रात्री फिरणारा असून त्याच्या डोळ्यांच्या बाहूल्या या मांजरीच्या डोळ्यांप्रमाणे उभ्या असतात. हे साप बारीक व लांब असतात व त्यांच्या रंग रूपावरून त्यामध्ये अनेक प्रकार दिसतात. यामध्ये जर आपण पाहिले तर बेडोमचा मांजरा सर्प, सलोनी मांजऱ्या सर्प इत्यादी होय.
या सापाची लांबी दोन फूट ते दोन मीटर पर्यंत असू शकते व या सर्व प्रकारच्या सापाने जर चावा घेतला तर तो मानवाला अपायकारक नाही परंतु फार वेदनादायी असतो. भारतामध्ये काश्मीरचे खोरे वगळता हा साप सर्वत्र ठिकाणी आढळून येतो. या जातीच्या सापाचे डोके चपटे असते व डोक्याच्या मानाने मान फार बारीक असते. शेपटी लांब असून अंगावर ठळक नक्षी असते.
3- उडता सोन साप – या प्रजातीच्या सापाचा शरीरावर काळेपट्टे व तांबडे ठिपके असतात व शरीरावर हिरवा किंवा पिवळा रंग असतो. या प्रजातीच्या सापाचे डोके चपटे असते व काळे असून त्यावर पिवळे पट्टे असतात. तीन ते सहा फूट लांबीचा हा साप असत.तसेच घनदाट जंगलातील उंच झाडांवर हा राहतो. भक्ष्याचा पाठलाग किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी या जातीचा साप झाडाच्या फांद्यांवरून उड्या घेतो.
4- झिलन साप- हा देखील एक निमविषारी साप असून किनारपट्टी तसेच दलदलीच्या ठिकाणी आढळून येतो. मासे, छोटे खेकडे तसेच शिंपले खाऊन तो उदरनिर्वाह करतो. या सापाची लांबी एक ते दोन फूट असते व शरीराचा वरील भाग काळसर राखाडी रंगाचा असतो. याची शेपटी आखूड असते व हा साप पिल्लांना जन्म देतो.
5- चिकणी नायकूल साप- हा साप अतिशय सडपातळ व लांबट असतो तसेच पिवळसर तपकिरी रंगाचा असतो. या सापाची लांबी तीन ते चार फूट असते तसेच सरडे, उंदीर खाऊन तो उदरनिर्वाह करतो. याचे डोके व मान जाडसर असते. हा साप अंडज प्रवर्गात मोडतो व मे ते जून दरम्यान या सापाची मादी अंडी देते.
6- श्वानमुखी साप – हा साप राखाडी तसेच तपकिरी रंगाचा असतो व याचे डोके व मान जाड असते. या सापाचे डोळे व नाकपुड्या डोक्याच्या वरच्या भागांमध्ये असतात व याची लांबी दोन ते पाच फूट असते. या प्रजातीचा साप प्रामुख्याने भारतीय किनारपट्टीत तसेच अंदमान निकोबार परिसरामध्ये आढळून येतो. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असतो.