सरड्यासारखा रंग बदलतो हा बेडूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Color changing frog : आसपासची परिस्थिती पाहून त्या अनुरूप आलेल्या त्वचेचा रंग बदलून स्वतःचे संरक्षण करण्याचे तंत्र निसर्गाने सरड्याच्या एका प्रजातीला दिले आहे, हे आपण सारेच जाणतो. रंग बदलणाऱ्या सरड्याच्या या करामतीवरून काही म्हणीदेखील प्रचलित आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बेडकाची एक प्रजातीदेखील अशीच सरड्यासारखी रंग बदलणारी आहे.

या बेडकाची खासियत म्हणजे ते आपले शरीर अगदी काचेसारखे पारदर्शक बनवू शकते. म्हणजे हे बेडूक जर हिरव्या रंगाच्या पानावर बसले असेल तर ते हिरव्या रंगाचे भासते. म्हणजे पानावर त्याचे अस्तित्वच जाणवत नाही. हे बेडूक फार नाजूक प्रकृतीचे असतात. मात्र, त्याची हिंमत भारी असते.

बेडकांच्या या प्रजातीला ग्लास फ्रॉग असे समर्पक नाव आहे. जगभरात ग्लास फ्रॉगच्या तब्बल १५७ जाती आढळून येतात. त्यातील सर्वात लहान प्रजाती ०.७८ इंच लांबीची असते. सर्वात मोठ्या आकाराच्या प्रजातीतील ग्लास फ्रॉग तीन इंचापर्यंत लांबीचे असते. सर्वसाधारणपणे ग्लास फ्रॉग हिरव्या रंगाचे असतात. मात्र, धोक्याची जाणिव होताच क्षणार्धात हे बेडूक आपले शरीर काचेसारखे पारदर्शक बनवते. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा हे बेडूक आपले शरीर पारदर्शक बनवते तेव्हा त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयव आपल्याला बाहेरून स्पष्ट दिसतात. अगदी या बेडकाचे हृदय धडधड करत असल्याचेही बाहेरून पाहता येते.

ग्लास फ्रॉगच्या नराला प्राण्यांमधील सर्वोत्तम पिता असे मानले जाते. याचे कारण म्हणजे हे नर आपल्या मादीने दिलेल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी जिवाची बाजी लावायलाही मागेपुढे पाहात नाहीत.