न्यूयॉर्क : काही लोक तासन्तास एकाच जागी बसून टीव्ही पाहत घालवतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय अशा लोकांसाठी म्हातारणात हिंडण्याफिरण्याच्या समस्येचा धोका तिपटीने वाढवते, असे एका अध्ययनातून समोर आले आहे.
या अध्ययनात ५० ते ७१ वयोगटातील निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला होता. सुमारे दहा वर्षे त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात आली. त्यातून असे निष्कर्ष समोर आले की, कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न करता दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे अतिशय हानीकारक आहे.
या अध्ययनात सहभागी जे लोक दिवसभरात पाच तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून टीव्ही पाहणारे होते त्यांच्यात दिवसभरात जेमतेम तासभर टीव्ही पाहणाऱ्यांच्या तुलनेत गतीशिलतेतील असमर्थतेचा धोका ६५ टक्के वाढलेला दिसून आला.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या शारीरिक हालचालींच्या पातळीवर त्यांचा कोणताच फरक पडला नव्हता. सोबतच जे लोक आठवड्यातून तीन तास वा त्याहूनही कमी शारीरिक सक्रिय होते, त्यांच्यासाठी हिंडण्याफिरण्याची समस्या जास्त वाढलेली दिसून आली आहे