Marathi News : चिनी खाद्यपदार्थांमध्ये किडे, सरडे, पाली, झुरळ, मांजर आदींचा समावेश असतो, हे आजवर साऱ्या जगाला माहीत झाले आहे; पण मेक्सिको या देशातही असा एक पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहे की, जो नाकतोडा (ग्रासहॉपर) या कीटकापासून बनवला जातो.
भारतात जशा मसालेदार भाज्या बनवल्या जातात, तसाच हा पदार्थ असतो. फरक एवढाच की तो नाकतोडे तळून बनवला जातो.मेक्सिकोमधील या लोकप्रिय पदार्थाचे नाव ‘चॅपुलिन्स’ असे आहे.
हा पदार्थ येथील लोक सकाळच्या न्याहारीमध्ये चवीने खातात. मेक्सिकोपासून मध्य अमेरिकेच्या काही भागांत नाकतोड्यापासून बनवला हा चॅपुलिन्स नावाचा पदार्थ विशेष लोकप्रिय आहे.
नाकतोडे पकडण्यासाठी लोक पहाटे पहाटे ऊठून माळरानात जातात. कारण, सकाळी वातावरणात गारवा असतो. अशा वातावरणात नाकतोडे फारसे सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांना पकडणे सोपे जाते. काही शेतकरी नाकतोडे पकडून बाजारात नेऊन विकतात.
रंजक बाब म्हणजे मेक्सिकोमधील या विचित्र पदार्थाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. असे सांगितले जाते की, सोळाव्या शतकापासून हा पदार्थ मेक्सिकोमध्ये खाल्ला जात आहे.
नाकतोड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे या पदार्थाकडे प्रोटीन्सचा एक स्रोत म्हणून पाहिले जाते. रेस्टॉरंट्समध्ये नाकतोड्यापासून बनणारा चॅपुलिन्स हा पदार्थ खूप महागात विकला जातो. याच्या एका प्लेटसाठी आपल्याला सुमारे चार हजार रुपये मोजावे लागतात.