घरात लहान बाळ हसताना, बागडताना पाहताना खूप आनंद होतो. लहान बाळांच्या गोंडस क्रीडा या भुरळ घालणाऱ्या असतात. ज्या घरात लहान बाळ असते त्या घरात नेहमीच आनंद असतो. या लहान बाळाच्या हसण्याच्या, ओरडण्याचा, रडण्याच्या क्रिया सातत्याने सुरु असतात.
परंतु अडचण येते ती बाळ रडल्यावर. बालक रडते याचे कारण लवकर घरच्यांना समजत नाही. बऱ्याचदा बाळाला भूक लागली असेल असे म्हटले जाते. परंतु प्रत्येक वेळी बाळाला भूक लागणे हेच कारण रडण्यामागे नसते. यामागे कोलिक अर्थात पोटशूळ / गॅसेस ही पोटाची समस्या देखील असते. ही समस्या लहान मुलांत सर्रास पाहायला मिळते.
ही एक पोटाची समस्या आहे. यात नवजात बाळ कोणत्याही कारणाशिवाय जास्त काळ रडत राहते. हे साधारण बाळंतपणाच्या दोन आठवड्यांनंतर सुरू होते आणि तीन किंवा चार महिने टिकू शकते. यात बालकाला त्रास होत असल्याने ते रडत राहते. पण जास्त घाबरण्याची गरज नाही. यात आपल्याला बालकाला आराम देण्यासाठी काही घरगुती इलाज तुम्ही करू शकता.
बाळाची मालिश करणे हा एक खूप चांगला पर्याय आहे. बदाम किंवा खोबरेल तेलाने बाळांची मसाज केल्याने खूप आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. जुने लोक सजूनही लहान बाळांची तेलाने मसाज करता. त्यामागे हेच शास्त्रीय कारण असावे.
गरम पाण्याची आंघोळ घालणे हा एक चांगला पर्याय आहे. आंघोळ करताना कोमट पाण्याने शेकल्याने पोटशूळ झालेल्या मुलांना आराम मिळतो. त्यांना पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होत असेल, तो याने कमी होऊन जातो. कोमट पाण्यात एक टॉवेल भिजवा, तो पिळून घ्या आणि बाळाच्या पोटावर हळूवारपणे लावत त्याला शेकवा. यामुळे बाळाला आराम पडतो.
बाळाला दूध पाजल्यानंतरकाधीही त्याचा ढेकर काढावा. यासाठी बाळाला तुमच्या खांद्यावर उलटे (पोटावर) झोपवा. मानेला आणि खांद्यांना हलके थापडवा. याने बाळाला ढेकर येईल. त्याच्या पोटातील गॅस बाहेर पडेल.
बाळाला पोटावर झोपवल्यानेही बराच आराम मिळतो. यासाठी, तुम्ही त्यांना हलकी उशी ठेवून किंवा तुमच्या मांडीवर उलटे झोपवू शकता. जर बाळाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्याला नक्कीच बरे वाटेल. तसेच बाळाच्या पाठीला हलक्या हाताने चोळा, त्यामुळे गॅस बाहेर येण्यास मदत होते.