अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठकपार पडली. या बैठकीत देशातील सरकारी शाळांमध्ये दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे आणि शिक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पुढील पाच वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे आणि १.३१ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यांच्या सरकारांच्या मदतीनं या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार आहे.

देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे.