अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वच नेत्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीतून ट्विट करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांवर सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे. मोदी यांनी म्हटलं आहे, ‘महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.’

अशा पद्धतीने भरभरून शुभेच्छा देताना मोदी यांनी कौतूकही केलं आहे. मात्र अलीकडं राजकीय कारणावरून केंद्र-राज्य संबंध ताणले गेले आहेत.

त्यातूनच केंद्राकडून राज्यावर विविध प्रकारे सतत अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राची बदनामी केल्याचा, राज्याचे योगदान नाकारलं जात असल्याचाही आरोप होतो. या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेल्या या शुभेच्छांवरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.