दळणवळणासाठी रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर ग्रामस्थांचा आक्रोश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर (प्रतिनिधी)- दळणवळणासाठी रस्ता नसल्याने डोंगरी भागातून पायावाटातून प्रवास करणार्‍या पारनेर तालुक्यातील काटवन दलित वस्ती भागातील ग्रामस्थांनी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन आक्रोश केला. ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना दळवळणाची सोय होण्यासाठी काटाळवेढा डोंगरवाडी ते काटवन दलित वस्ती पर्यंन्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम होण्याची मागणी करण्यात आली. सदर रस्त्याचे काम सुरु न झाल्यास नवीन वर्षाच्या प्रारंभी नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, नामदेवराव चांदणे, कडूबाबा लोंढे, कृष्णा वायदंडे, रंगनाथ वायदंडे, सभाजी वायदंडे, रामदास वायदंडे, नागेश वायदंडे, रवींद्र वायदंडे, भीमराज डोंगरे, नवनाथ लामखडे, संपत गुंड, सुभाष डोंगरे, बाळू डोंगरे, बबन डोंगरे आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पारनेर तालुक्यातील काटाळवेढा डोंगरवाडी ते काटवन दलित वस्ती पर्यंन्त ग्रामस्थांना दळणवळणासाठी रस्ता नाही. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. काटाळवेढा ते डोंगरवाडी दरम्यान डांबरी रस्ता असून, त्यापुढे काटवन दलित वस्ती पर्यंन्त रस्ता नसल्याने ग्रामस्थांना पाऊलवाटांनी डोंगरी रस्त्यातून दळणवळण करावे लागते.
एखादा व्यक्तीला तातडीने दवाखान्यात घेऊन जायचे असल्यास कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. येथील ग्रामस्थांना गंभीर आजार झाल्यास वेळेत रुग्णालयात दाखल न केल्याने प्राण गमवावे लागले आहेत. तर रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधींनी येथील ग्रामस्थांसाठी कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या नसून, फक्त निवडणुकीत मत मागण्यासाठी येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दळवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, तातडीने काटाळवेढा डोंगरवाडी ते काटवन दलित वस्ती पर्यंन्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर लाईव्ह 24