लोकसभेआधी लागणार दहावी, बारावीचा निकाल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज सुरळीत सुरू असून, बारावीचा मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

या पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. त्याअगोदर दहावीचा निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, ४ जून रोजी निकाल लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

कदाचित ३० किंवा ३१ मे रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षे दोन्ही परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होत आहेत. निकालानंतर लगेचच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया जाहीर होतात.

निकाल लवकर लागला तर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेसाठी जास्त अवधी मिळतो. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या, दहावी व बारावीच्या निकालाची तयारी सुरू आहे.

निकाल दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या कालावधीत आणि वेळेत लागतील. निकालाच्या कामकाजावर कुठलाही बहिष्कार नाही. लवकर निकाल लावायचे की नाही, हे आताच सांगता येणार नाही.

राज्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावी, तर १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात,

तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. यंदाही याच कालावधीत निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाची तयारी सुरू आहे.