Maharashtra News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्यातील १३ हजार ४७८ विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशाची संधी प्राप्त होणार आहे.
तसेच एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे. पुरवणी परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा सर्वाधिक ५१.४७ टक्के निकाल लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा सर्वात कमी २२.२२ टक्के निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. विद्याथ्यांना विषयनिहाय गुणपत्रक डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्याथ्र्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळातर्फे १८ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. राज्यात परीक्षेदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे काही विषयांची परीक्षा पुढे करण्यात आली होती.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील १३ हजार ४७८ उत्तीर्ण झाले आहेत.
राज्याची उत्तीर्णतेची टक्केवारी २९.८६ टक्के एवढी आहे. त्यातच एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्याथ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
विभागनिहाय निकाल
पुणे २२.२२
नागपूर ४१.९०
छत्रपती संभाजीनगर ३७.२५
मुंबई १५.७५
कोल्हापूर २९.१८
अमरावती ४३.३७
नाशिक ४१.९०
लातूर ५१.४७
कोकण २७.०३
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला.
परीक्षेचा निकाल ३२.१३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. नियमित परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेतही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे.
मंडळामार्फत १८ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विज्ञान, कला, वाणिज्य व ७० हजार २०५ विद्याथ्र्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षा दिलेल्या ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक ५८.५५ टक्के निकाल लातूर विभागाचा लागला आहे.
राज्यात मुंबई विभागातून सर्वाधिक २८ हजार ८६६ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. या विभागाचा निकाल सर्वात कमी २४.८२ टक्के लागला आहे. तर, लातूर विभागापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागाचा ४९.६४, नागपूरचा ३७.६३, नाशिकचा ३६.८१, अमरावती ३२.०२, कोल्हापूर ३०.१५, पुणे २९.३६ आणि कोकण विभागाचा २७.७४ टक्के निकाल लागला आहे.
एकूण २५ हजार ४४९ मुलींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ९ हजार २९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ४३ हजार ४६० मुलांपैकी १२ हजार ८५० मुले उत्तीर्ण झाले. मुलींची टक्केवारी ३६.५२ असून, मुलांपेक्षा सात टक्क्यांनी अधिक आहे.
शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ५५.२३ टक्के लागला आहे. तर कला शाखेचा २०.५९ वाणिज्य शाखेचा १४.६८, व्यवसाय अभ्यासक्रम १७.८६ आणि आयटीआयचा ८१.२५ टक्के निकाल लागला आहे.
सर्वाधिक २६ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. त्याखालोखाल वाणिज्यची २० हजार ६२४ आणि कला शाखेची २० हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सर्वात कमी निकाल वाणिज्य शाखेचा लागला आहे.