राष्ट्रवादीला हादरा …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन केज मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी परळीत भाजपामध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा आता केजमध्ये भाजपाकडून लढणार आहेत. . दरम्यान, नमनालाच राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच भाजपामध्ये खेचून मंत्री पंकजा मुंडे यांनी बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना हादरा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. विमल मुंदडा यांनी दोन वेळा भाजपाकडून व नंतर तीन वेळा राष्ट्रवादीकडून विधानसभा गाठली. त्यांना मंत्रीपदाचा मानही मिळाला होता. सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या जिल्ह्यातील त्या एकमेव नेत्या ठरल्या.

दरम्यान, गतवेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपाच्या प्रा. संगीता ठोंबरे यांनी नमिता मुंदडा यांचा पराभव करत विजय संपादन केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्याशी त्यांचे मतभेद निर्माण झाले.

लोकसभा निवडणुकीवेळी हा वाद निवळला होता. त्यानंतर खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजी काही कमी झाली नाही. त्यामुळे मुंदडा कुटुंबीयांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अहमदनगर लाईव्ह 24