प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे.. कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या कोरोनाबाधीत रूग्णाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने पॉझीटीव्ह रूग्णाच्या हायरीस्क व लो रिस्क संपर्कातील सर्वांना ताब्यात घेत त्यांचे विलगीकरण केले.

त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर मृत रूग्णाच्या निकट संपर्कातील आणखी चार रूग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हाभर सुन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर प्रशासनाने क्लस्टर कन्टेन्टमेंट प्लॅन लागू करीत कडक उपाययोजना केल्या. प्रशासनाने केलेल्या सर्व ‘पॉझीटीव्ह’ प्रयत्नांमुळे अखेर कोरोनाला ‘निगेटीव्ह’ करीत पहिल्या तीन रूग्णांना रूग्णालयातून आज 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेदरम्यान डिस्चार्ज देण्यात आला.

प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीनही रूग्णांचे दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने 19 दिवसानंतर या रुग्णांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वॉर्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. बुलडाणा येथे 28 मार्च रोजी एका संशयित व्यक्तीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधीत आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

यामध्ये चार संशयितांचे रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आले. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वॉर्डात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले.

कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा, तर दुसरा तपासणी रिपोर्टही निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. घरी जातांना या रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यांनी मनोमन वॉर्डातील नर्सेस, ब्रदर, आरोग्य कर्मचारी यांचे मनोमन धन्यवाद मानले.

अहमदनगर लाईव्ह 24