‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त कठीण होता. तसा आमचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्हाला थांबविण्यात आल्यानंतर मोठी समस्या समोर आल्यासारखे वाटले, पण इथे घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या आणि माणसांची वागणूक चांगली असल्याने घरापासून असलेला

दुरावाही सुसह्य झाला….. ….बंगळूरू येथून राजस्थानकडे निघालेल्या एका कामगाराची ही प्रतिक्रिया राज्य शासन आणि नंदुरबारच्या प्रशासन करीत असलेल्या मदतकार्यातील संवेदनशिलता स्पष्ट करणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या इतरही नागरिकांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत. परप्रांतातील 116 व्यक्तींची खापर येथील विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जरी जिल्हाबंदी करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांची जिल्ह्यात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील आणि प्रांतातील एकूण 206 व्यक्तींची सोय तात्पुरत्या निवाऱ्यात करण्यात आली आहे.

गुजरात सीमेकडून जाणाऱ्या कामगारांची व्यवस्था खापर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात आहे. यात महिला व बालकांचाही समावेश आहे. प्रशासनाने या केंद्रात त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वसतिगृहाच्या दोन इमारतीतील 14 कक्षात ही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येकाला स्वतंत्र कॉट, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, भोजन, नाश्ता, नियमित वैद्यकीय तपासणी, मनोरंजनासाठी टीव्ही अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्वारंटाईन केलेल्या दोन व्यक्तिंना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आवश्यकता असल्यास रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरीकदेखील मदतीला पुढे सरसावले आहेत. परराज्यात माणुसकीच्या ओलाव्याने या सर्वांना आपलेसे केले आहे. घराची ओढ तर आहेच, पण अनोळखी व्यक्तिचा कुटुंबाप्रमाणे मिळणारा स्नेहदेखील तेवढाच हवासा वाटणारा आहे.

‘अन्नासाठी दाही दिशा…..’ अशी भावना लॉकडाऊननंतर यांच्या मनात आली असेलही पण इथल्या वास्तव्याने ‘देणाऱ्याचे हजारो हात’ त्यांना अनुभवायला मिळाले असतील. म्हणूनच निवाऱ्यात थांबलेली ग्रामीण भागातील भगिनी ‘बठा व्यवस्था होई राहीना, काय टेन्शन नाय’ अशी खुलेपणाने प्रतिक्रिया देते. संकट मोठे आहे, पण अशा लहान अनुभवातून माणसाची जवळीकता अनुभवायला मिळते आहे.

देश म्हणून सर्व एकत्र उभे राहिलेले दिसतात. गावाकडचे प्रेम तर काही वेगळेच असते. त्याचाच अनुभव खापर येथील या विद्यार्थी वसतीगृहात येतो. जणू एक कुटुंब काही दिवसासाठी एकत्र आले आहे. वेदना सहन करणे कठीण असेलही, पण त्यासाठी आवश्यक असणारे बळ या निवाऱ्याने दिले हे मात्र खरे.

अहमदनगर लाईव्ह 24