जामखेड :- रस्त्याच्या कारणावरून तालुक्यातील भवरवाडी येथे दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत बाराजण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी दोन्ही गटांकडून दगड व काठयांचा सर्रास वापर करण्यात आला.
ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या ते दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
एका गटाकडून खुनाच्या प्रयत्नाचा तर दुसऱ्या गटाकडून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील भवरवाडी येथे मंगळवारी सकाळी आठ ते दहाच्या सुमारास दोन गटांत रस्त्याच्या कारणावरून काठया व दगडाने जोरदार हाणामारी झाली.
याप्रकरणी एका गटाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश अशोक वारंगुळे, सुनील अशोक वारंगुळे, अशोक विठ्ठल वारंगुळे, दत्तात्रय बापू बामदळे, श्रीराम बापू बामदळे, मधुकर बापू बामदळे, द्वारका प्रकाश वारंगुळे, लीलाबाई अशोक वारंगुळे,
शोभा सुनील वारंगुळे, रेखा मधुकर बामदळे, प्रयागाबाई दत्तात्रय बामदळे, लता श्रीराम बामदळे, गोकुळ शतृघ्न शिंदे, आदी एकूण तेरा जणांविरोधात लखन भगवान शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात लखन भगवान शिंदे, दीपक भगवान शिंदे, स्वप्निल पोपट शिंदे व पुष्पा भगवान असे चौघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दुसऱ्या गटाने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
वहिवाटीचा रस्ता आमच्या हद्दीत आहे. या रस्त्याने जायचे नाही, असे वारंवार आरोपींकडून धमकावले जायचे. सदरचा शेतीत जाण्याचा रस्ता आरोपींनी गेल्या चार महिन्यांपासून आडवला होता. त्यामुळे फिर्यादी व त्याचे साथीदार पायवाटेने जायचे. मात्र, सदरचा रस्ता आमच्या हद्दीत आहे. या रस्त्याने जायचे नाही, असे आरोपी म्हणत होते.
या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना दगड काठ्यांनी बेदम मारहाण केली, असे प्रकाश अशोक वारंगुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला आरोपी लखन भगवान शिंदे, दीपक भगवान शिंदे, गोटू अण्णासाहेब शिंदे, काळू पोपट शिंदे, पोपट बाजीराव शिंदे, पुष्पा भगवान शिंदे, राधा लखन शिंदे, चारूशिला शिंदे, अशा एकूण नऊ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मारहाणीत प्रकाश अशोक वारंगुळे, सुनील अशोक वारंगुळे, द्वारका प्रकाश वारंगुळे, शोभा सुनील वारंगुळे, लीलाबाई अशोक वारंगुळे, अशोक विठ्ठल वारंगुळे, दत्तात्रय बापू बामदळे हे सात किरकोळ तर श्रीराम बापूराव बामदळे हे गंभीर जखमी झाले असून,
त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रकाश सुनील वारंगुळे, सुनील अशोक वारंगुळे, अशोक विठ्ठल वारंगुळे, गोकुळ शत्रुघ्न शिंदे, मधुकर बापू बामदळे, लखन भगवान शिंदे, दीपक भगवान शिंदे, स्वप्निल पोपट शिंदे, पोपट बाजीराव शिंदे, अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.