Ration Shop : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होणार २४१ रास्त भाव दुकाने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Shop : पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातील १३ तालुक्यांमध्ये नव्याने २४१ रास्त भाव दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरूर खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यांत २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकाने सुरू करावयाची आहेत. केंद्र शासनाच्या योजना, पीक विम्यापासून इतर शासकीय योजनांचे दाखले किंवा प्रमाणपत्रांच्या सुविधा रेशन दुकानांवर देण्यात येत आहेत.

तसेच, अल्पदरात इंटरनेट सुविधाही सुरू करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नसून घराजवळच या सुविधा प्राप्त करता येतील.

या उद्देशाने ठराविक अंतरावर रास्त भाव दुकाने सुरू करण्याचा मानस असून, जिल्हा पुरवठा विभागाकडून शिधावाटपासोबत इतर सहामाही कार्यक्रमाची कालबद्धता देखील निश्चित करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात पूर परिस्थिती, आपत्ती किंवा तातडीची गरज असल्यास शासकीय सेवा, योजना किंवा मदत तत्काळ करता येणे शक्य असल्याने या कालबद्ध कार्यक्रमानुसार नव्याने ग्रामीण भागातही रास्त भावन दुकानांची संख्या वाढविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी दिली. इच्छुकांनी वेळेत अर्ज पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.