जीवन जगवण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. त्या साठीच आजपर्यंत २६ वर्षे कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेला हसवत आलो. पण आज मला रडावं लागतंय, अशी खंत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
आठवड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या मातोश्री सोनाबाई माणिकराव गुंजाळ यांच्या स्मृतीिदनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राहुल जगताप, साहेबराव दरेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के,
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, शिक्षकनेते आबासाहेब कोकाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, बाजार समितीचे आजी माजी संचालक आदी उपस्थित होते.
इंदोरीकर म्हणाले, निसर्ग नियमानुसार अनेक बाबी सत्य व निश्चित आहेत. पण ज्या लोकांचा देवावर आणि ग्रंथावर विश्वास नाही, त्यांना हे अमान्य आहे. पण त्याला कोण काय करणार. निसर्ग नियमाच्या विरोधात माणूस जगू शकत नाही.
नद्यांचे प्रदूषण हा गंभीर विषय बनत चालला आहे. माझं एक सांगणं आहे की, अंत्यविधीनंतर अनेक जण रक्षा नदीत टाकतात, त्याने प्रदूषणात भरच पडते,जर ती रक्षा शेतात टाकली तर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आपण हातभार लावू शकतो, असे ते म्हणाले.