३१ जानेवारी २०२५ मुंबई : सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार असून त्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून माहीम येथील रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकासही केला जाईल. खासगी विकासकांवर अवलंबून न राहता एमएमआरडीए, म्हाडा, सिडको व मुंबई महापालिकेच्या मदतीने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईचा विकास केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. सिद्धिविनायक मंदिर आणि माहीम मतदार संघातील म्हाडाच्या इमारतींची पाहणी केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून अनेक विकासक मूळ सदनिकाधारकांची भाडी न देता प्रकल्प अर्धवट सोडून गेले आहेत.प्रकल्प अर्धवट सोडून गेलेल्या विकासकांना रद्द केले जाईल. सामान्यांना परवडणारी व प्रशस्त घरे देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करायचा असल्यास तेही करू.
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळासमोर निर्णय करू.रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल. ठाण्यातही अशा पद्धतीने सामूहिक पुनर्विकास योजना सुरू झालेली आहे.सामूहिक पुनर्विकास योजना राबवताना येत असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए,सिडको व बीएमसी या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबवण्यात येईल.या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयीसुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल,असेही शिंदे म्हणाले.
घरात बसून काम होत नाही, ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षांत मुंबईचा विकास झपाट्याने सुरू केला असून आताही तो थांबणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत.त्यामुळे, मुंबईचा विकास करताना मी कधीही श्रेयासाठी पुढेपुढे केले नाही.
मात्र, काही जण घरात बसून काम न केल्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत.लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला,तो महायुतीच्या कामांकडे पाहून. विधानसभा निवडणुकीत जनतेने एडिट केले आणि डिलीटही केले. आता कसले क्रेडिट घेताय? असा टोला शिंदे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.