महाराष्ट्र

प्रवाशांच्या सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी, एसटीच्या ताफ्यात ६० ई-बसेस दाखल !

Published by
Ahmednagarlive24 Office

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेस एसटीच्या ताफ्यात हळूहळू दाखल होऊ लागल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर धावणाऱ्या २० ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

त्यानंतर येत्या आठवडाभरात एसटीच्या ताफ्यात आणखी जवळपास ६० ई-बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे.

एसटी महामंडळाने प्रदूषणमुक्त प्रवास या उद्देशाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्थानके निर्माण केली जात आहेत. या प्रकल्पाची सुरुवात बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर सुरू करून करण्यात आली आहे.

टप्प्याटप्याने आणखी बसेस दाखल होणार होत्या. मात्र, गेल्या ५ महिन्यात तांत्रिक कारणांनी बसेस दाखल होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात संबंधित कंत्राटदारांकडून बसेस येण्याची शाश्वती एसटी महामंडळाला देण्यात आली असून येत्या आठवडाभरात ६० नव्या ई-बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

या बसेस नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार? तिकीट दर काय असणार याबाबत माहिती गुलदस्त्यात असून बसेस दाखल झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नवीन इलेक्ट्रिक बस येत आहेत, ही चांगली बाब आहे. पण निर्धारित वेळेत या बस आल्या असत्या तर प्रवाशांची गैरसोय टळली असती. आता या गाड्या भाडेतत्त्वावरच्या असून यापुढे एसटीने स्वमालकीच्या गाड्या घ्याव्यात. असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office