EPFO Interest Rate : सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजने अंतर्गत ठेवींवर ८.१५ टक्के व्याजदराची पुष्टी केली आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ) ने २८ मार्च २०२३ रोजी २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर ८.१५ टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला होता.
अशा प्रकारे ईपीएफओने आपल्या सहा कोटी सदस्यांसाठी पूर्वीच्या ८.१० टक्क्यांवरून व्याजात किरकोळ वाढ केली. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, ईपीएफओने आपल्या प्रादेशिक कार्यालयांना २०२२-२३ साठी ८.१५ टक्के दराने ईपीएफवरचे व्याज सभासदांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले आहे.
अर्थ मंत्रालयाने व्याजदरावर सहमती दर्शवल्यानंतर हा आदेश आला आहे. आता ईपीएफओची प्रादेशिक कार्यालये ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा करतील. ईपीएफओने मार्च २०२२ मध्ये २०२१-२२ साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर ८.१० टक्के कमी केला आहे. १९७७-७८ नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर होता, जेव्हा ईपीएफ व्याजदर आठ टक्के होता.