महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; लोणी परिसरावर शोककळा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : येथील प्रवरा परिसरावर बिबट्याने संक्रांत आणली असून लोणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी रविवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाचे अथवं प्रवीण लहामागे (वय ९, रा. लोणी), असे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व लहामागे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या गोसावी कुटुंबातील संदीपसोबत खेळण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

दोघांनी गावातून दूध आणले व संदीप गोसावी दूध देण्यासाठी घरात गेला. याचवेळी बिबट्याने संधी साधत अथर्ववर हल्ला केला.लहामागे व गोसावी कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला; मात्र अथर्व दिसून आला नाही.

रात्री १० वाजेच्या सुमारास गोसावी यांच्या मक्याच्या शेतात अथर्व जखमी अवस्थेत आढळला. त्यास तातडीने प्रवरा रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. लोणीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज आठरे व पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन फटाके फोडत बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला;

मात्र बिबट्या पुन्हा घटनास्थळी मक्याच्या शेतात गुरगुरत राहिला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कोपरगाव येथील अधिकारी सागर केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली, वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी

हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या संदर्भात वनखात्याच्या आधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन त्यांना सर्वतोपरी सूचना केल्या आहेत; मात्र बिबट्यांची संख्याच वाढत चालल्याने वनखात्याच्या मर्यादादेखील आता स्पष्ट होत आहेत.

यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन काही नियमांमध्ये बदल करण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे घरला पाहिजे. वाघांसाठी असलेले नियमच बिबट्यांनाही लागू करण्यात आल्याने वनखात्यावरही काही बंधन आहेत.

याबाबत प्रामुख्याने विचार करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

रेस्क्यू ऑपरेशन राबविणार

प्रवरा परिसरात अशी घटना घडली नव्हती, ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घेत आहोत. अनेक दिवस अन्न मिळाले नसल्यास बिबट्या अशा प्रकारे हल्ला करू शकतो; मात्र आता पुणे येथून फॉरेस्ट खात्याची टीम बोलावून तातडीने किमान ३ पिंजरे लावत रेस्क्यू करून बिबट्याचे लोकेशन पाहून त्यास जेरबंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. – सागर केदार, वन अधिकारी, कोपरगाव

आणखी किती जणांचे बळी घेणार?

घटनेत ९ वर्षीय मुलाचा करुण अंत झाला. त्यामुळे आता तरी वनविभाग आपले शासकीय नियम व प्रोटोकॉल बाजूला सारून जिथे बिबट्याचा संचार तिथे पिंजरा लावून बिबटे जेरबंद करणार का? हाच प्रश्न आहे. आणखी किती नागरिकाना बिबट्याच्या जबड्यात आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office