अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राजुरी : गावातील भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार राहाता तालुक्यातील राजुरी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला.
राजुरीमध्ये गावातील एका कुटुंबात भांडणे चालू होती. त्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत होत असताना याची माहिती गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भांडणे सोडविण्यासाठी दोन ते तीन प्रतिष्ठित व्यक्ती गेले.
त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांडणे करणाऱ्या काही टारगट लोकांनी या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनाच धक्काबुक्की केली. याबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांनी काल सकाळी बैठक बोलावली होती.
इथून पुढे अशी भांडणे व हाणामारी करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.
गावात सलोखा कायम रहावा, यासाठी अशा व्यक्तींना पोलिसांमार्फत समज देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.