पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांचा डल्ला, १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हापूर :  सर्वसामान्यांना भयमुक्त करण्याची जबाबदारी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांवर ब्रीदवाक्यानुसार आहे, परंतु आता नागरिकांबरोबरच पोलिस ठाणेही असुरक्षित बनले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास केली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाइल हस्तगत केले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे.

याशिवाय सात लाखांची रोकडही पोलिस स्टेशनमध्ये होती. चोरट्यांनी गुरुवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्याच्या कारकून स्टोअरमध्ये प्रवेश केला व लोखंडी कपाटातून विविध गुन्हे व कारवायांत जप्त करण्यात आलेले १८५ मोबाइल फोन तसेच सात लाखांची रोकड हातोहात लंपास केली.

पण याची खबर पोलिसांना तब्बल १२ तासांनंतर लागली आणि पोलिसांनी स्वत:च्याच कार्यालयात श्‍वानपथकाला पाचारण केले. यासोबत ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे शोधण्याचा प्रयत्नही केला.

या घटनेमुळे सर्वसामान्यांबरोबर पोलिस ठाणेही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले आहे. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी शहरासाठी महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले होते.

मात्र, त्यांच्या बदलीनंतर जयसिंगपूर पोलिसांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात रस दाखवला नाही. तसेच आज अनेक ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद आहेत, असेही उघडकीस आले आहे.

पोलिस ठाण्यातील चोरीच्या या घटनेनंतर पोलिसांची नामुष्की झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत चोरट्याचा माग काढण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. जयसिंगपूर, इचलकरंजी व सांगली परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24