Crime News : अनैतिक संबंध लपवण्यासाठी मातेने केली एका दिवसाच्या अर्भकाची हत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crime News : नवी मुंबई – तुर्भे स्टोअर्समधील कचऱ्याच्या डब्यात मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या अर्भकाची हत्या आईनेच नाळेच्या सहाय्याने गळा आवळून केल्याचे उघडकीस आले. विवाहबाह्य संबंधातून अर्भकाचा जन्म झाला होता आणि ही घटना पतीपासून लपवून ठेवण्यासाठीच महिलेने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी महिलेला हत्येच्या गुह्यात अटक केली.

१७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास कचऱ्याच्या डब्यात अर्भकाचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनात अर्भकाचा नाळेच्या सहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

पोलिसांनी त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या माता-बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांचे सहाय्य घेतले होते. डॉ. गायकवाड आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक परिसरातील सर्व गर्भवती मातांची यादी तयार केली. त्यानंतर प्रसूतीसाठी नावनोंदणी न केलेल्या मातेचा शोध सुरू होता.

त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिकांशी संवाद साधून माहिती मिळवण्या प्रयत्न केला. यादरम्यान, एका सुजाण नागरिकाने आपण राहत असलेल्या परिसरात एका गरोदर तरुणीला पाहिल्याचे तसेच आता गर्भवती नसून तिच्याजवळ अर्भक देखील नसल्याचे सांगितले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर २८ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता प्रकरणाचा उलगडा झाला. विवाहाअगोदर आपले एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रेमसंबंध तुटल्यानंतर चार महिन्यांपूर्वी आपण दुसऱ्या तरुणासोबत विवाह केला. यादरम्यान या महिलेला लग्नाअगोदरच्या विवाहबाह्य संबंधामुळे आपण गरोदर राहिल्याचे समजले आणि ती तुर्भे स्टोअर्स येथे आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास आली होती. लग्नाअगोदरच्या संबंधामुळे गरोदर राहिल्याचे आपल्या पतीला समजू नये यासाठी तिने अर्भकाची नाळेने गळा आवळून हत्या केल्याचे तसेच नंतर कचऱ्यात टाकून दिल्याची कबुली महिलेने दिली.