महाराष्ट्र

बांबू लागवडीसाठी हेक्टरी ७ लाखांचे अनुदान ! राज्यात १० लाख हेक्टरवर बांबू लागवड होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : जगभरात वाढत्या तापमानामुळे आणि हवेतील कार्बनच्या प्रमाणामुळे जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी बांबूची लागवड हा शाश्वत उपाय ठरू शकतो,

असे सांगत राज्यात १० लाख हेक्टरवर बांबूची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

शुक्रवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते. पर्यावरण जागृतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत नऊ जानेवारी रोजी ‘शाश्वत पर्यावरण विकास’ परिषदेचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद होणार असून, या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबरच उद्योग क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शन करणार असल्याचे या वेळी पटेल यांनी सांगितले.

राज्य शासन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका ठामपणे निभावत असताना आता पुढील काळात खासगी क्षेत्रातील अग्रणी उद्योगांनीदेखील पुढे येऊन बांबू लागवड आणि वापर यातील संधीकडे लक्ष देऊन देशाच्या शाश्वत विकासात शासनाच्या बरोबरीने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे.

यासंदर्भात खासगी आणि सरकारी संस्था तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बांबू वृक्ष लागवड आणि वापर यात असलेल्या संधीबाबत अवगत करण्यासाठी या परिषदेचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बांबू लागवडीसाठी हेक्टरी ७ लाखांचे अनुदान

पर्यावरण संरक्षणाबरोबरच या योजनेमुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य होणार आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये बांबू रोप लागवडीसाठी प्रतिहेक्टर ७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून,

पाण्यासाठी विहीर पाडल्यास त्यावर अनुदानापोटी ४ लाख रुपये अधिक मिळतील. बांबूच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील वाढणार आहे. त्यामुळे ‘मनरेगा’अंतर्गत राज्यात होणारी ही बांबू लागवड योजना संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरेल, असा दावा पटेल यांनी या वेळी केला.

Ahmednagarlive24 Office