Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात आपले एक वेगळेच वलय निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाबत एक मोठी बातमी आली आहे. ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिल्याने मोठा अपघात घडलाय.
भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री ही धडक बसली. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकची जोराची टक्कर या गाडीला बसली. यात कारचे मोठे नुकसान झाले असून नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.
कशी घडली नेमकी घटना?
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार करण्यासाठी नान पटोले हे गेले होते. हे काम आटोपून रात्रीच्या सुमारास परतत असताना ते भिलेवाडा गावाजवळ आले. भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं यावेळी त्यांच्या कारला मागून धडक दिली.
ही टक्कर इतकी जोरात होती की, नाना पटोले यांच्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला होता. दैव बलवत्तर म्हणून अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर सुखरूप राहिले. ट्रकचं नित्रंयण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अपघातावरुन काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक ट्विट करत आरोप केला आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असे म्हणत त्यांनी असाही आरोप केलाय की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला असून ही घटना गंभीर घटना असल्याचे ते म्हणालेत.
पुढे ट्विट मध्ये त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका असून मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेब सुखरूप आहेत असे ट्विटमध्ये म्हटले आहे.