अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलीला फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली.
आशीष पटेल (३५), मोहम्मद इस्माईल इम्रान शेख (२९), विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया (२२) अशी त्यांची नावे आहेत. टीव्ही मालिकांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारी यातील १४ वर्षांची पीडित मुलगी पालघरची आहे. ती एक वर्षापासून अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत प्रयत्नात होती.
या दरम्यान तिची ओळख यातील कास्टिंग डायरेक्टर विनोदकुमार अजमेरियाशी झाली. त्यानंतर विनोदकुमारने तिची ओळख दुसरा कास्टिंग डायरेक्टर आशीष पटेल याच्याशी करून दिली. त्यांनी पीडितेला टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून मुंबईला बोलावले. त्यानंतर या तिघांनी मुलीला परपुरुषांशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली.
एवढेच नव्हे, तर तिला त्यातून चांगले पैसे मिळतील, असे सांगून वेश्या व्यवसायात ढकलले. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांच्या मदतीने अंधेरी (प.) येथील मॅक्डोनाल्ड हॉटेल येथे सापळा लावून पीडितेची सुटका केली.