जालना: जालना येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सेनगाव येथे डांबून ठेवण्यात आले. नंतर तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २३ दिवसांनंतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली.
तीन आरोपींना अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. या मुलीची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
चंदनझिरा भागातील १३ वर्षांच्या मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली होती. या मुलीचा व आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात केली होती.
या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी तिला फूस लावून पळवून नेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता या मुलीला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील एका शेतवस्तीवर डांबून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्या शेतवस्तीवर छापा टाकून मुलीची सुटका केली. शिवाय तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या दोन महिलांसह एका आरोपीस अटक केली आहे.
दत्ता धनगर (सेनगाव, जि. हिंगोली) याने मुलीवर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले. १३ नोव्हेंबर रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चंदनझिरा ठाण्यात दाखल झाली.
त्याच दिवशी या दोन महिलांनी तिला फूस लावून पळवले होते. या दोन्ही महिला बसस्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करतात असे पोलिसांनी सांगितले. या मुलीला त्यांनी मनमाड, औरंगाबाद, वाशिम व नंतर सेनगावला नेले होते.