महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident : ट्रक चालकाच्या डुलकीमुळे ‘समृद्धी’वर अपघात ! दोघांचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Samruddhi Highway Accident : नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाला डुलकी आल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. या अपघातात चालक व वाहक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर समृद्धी महामार्गावर मांजरखेड गावाजवळ घडली.

चालक मोहम्मद फैजान मोहम्मद अली (४८) तर वाहक मोहम्मद ममताज मोहम्मद शेख (४६, दोघेही रा. शेरघाटी, बिहार) अशी मृतकांची नावे आहेत. मो. फैजान व मो. ममताज हे दोघेही नागपूरकडून मुंबईकडे डब्ल्यूबी २३ एफ ७४१०० क्रमांकाच्या ट्रकने जात होते.

त्यावेळी तळेगाव दशासरजवळ चालकाला झोपेची डुलकी आली. त्यामुळे पुलाच्या सिमेंट कठड्यावर हा ट्रक धडकला. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. तळेगाव दशासरचे पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदरासाठी चांदूर रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी मृतकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून, त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे शासन व प्रशासनाकडून यापूर्वीही सांगण्यात आले होते; मात्र ती घोषणा केवळ कागदावरच दिसून येत असल्याची नाराजी यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office