अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे विस्कटलेली अर्थव्यवस्था सावरता असताना एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा बँकिंग परवाना गुरुवारी रिझर्व्ह बँकेने रद्द केला. उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी सुरु केलेल्या या बँकेच्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत 13 शाखा आहेत.
या बँकेचे अन्यत्र विलीनीकरण होणार असल्याचे सांगण्यात येते. सुमारे 2003 च्या सुमारास या बँकेची स्थापना झाली. या बँकेच्या 100 कोटीपर्यंत ठेवी पोहचल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षात अनेकांनी ठेवी काढून घेतल्या. सध्या बँकेत एकूण 40 ते 50 कर्मचारीच काम करत आहेत.
या बँकेचे पूर्वी स्टेट बँकेच्या कोषागार शाखेजवळ मुख्यालय होते. ते अलीकडील काही वर्षात जेम्सस्टोन संकुलात स्थलांतरित झाले आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन महिन्यांपासून बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यामुळे कर्जव्यवहार पूर्णत: बंद होता. फक्त कर्जवसुलीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना होत्या.
ठेवीदारांचे पैसे नियमित परत मिळत होते. त्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती. तरीही बँकिंग परवाना का रद्द झाला हे समजू शकले नाही. याच महिन्यात 9 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता.
परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला होता.