महाराष्ट्र

तीव्र पाणीटंचाई ! विकतचे पाणी पिण्याची वेळ,महिलांमध्ये नाराजी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : गोदावरीचे आवर्तन लांबल्याने पुणतांबा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी तसेच गोदवरी कालव्याचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

पुणतांब्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून पाणीप्रश्नावर सुरू आहे. नुकत्याच अंदाजे ३२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम होऊनही तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असेल, तर अशा पाणी योजनांचा गावाला काय उपयोग? असा प्रश्न महिलांमधून उपस्थित होत आहे.

मागील वर्षी पाऊस कमी झाला. नाशिकची धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती; परंतु नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा हा पाण्याचा वाद समन्यायी कायद्याने वाढला. नगरचे म्हणजे राहाता, कोपरगाव तालुक्याच्या हक्काचे शेतीचे पाणी गेले. आता पिण्याचे पाणी जाते की काय? अशी शंकेची पाल पुणतांबेकरांच्या मनात चुकचुकत आहे.

गोदावरी कालव्याचा आवर्तन कालावधी वाढला असून उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पुणतांबेकरांना उन्हाच्या तीव्रतेचा चटका बसत आहे. पिण्याच्या पाण्याचा तिव्र टंचाईचा झटकाही बसत आहे. त्यामुळे पुणतांबेकरांवर क्षारयुक्त पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

२५ रुपये प्रति जारप्रमाणे पाणी विकत घेऊन ताहान भागविण्याची वेळ पुणतांबेकरांवर आली आहे. गावचा पाणीप्रश्न कायमचा कधी मिटणार ? आसा सवाल नागरिक, महिला विचारत आहेत. गोदावरी कालव्यांना अवर्तन लवकर सोडण्याची मागणी नागरीक व महिलांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office