काळाचा घाला ! परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडले

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर ही घटना घडली.

ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बहीण व दोघे भावांचा समावेश होता.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात ते मागील काही दिवसांपासून राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, आज (दि.८) सकाळी दहा वाजता बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात हे तिघे चालले होते. याचवेळी दोन हायवा एकमेकांना ओव्हरटेक करत होत्या.

याच नादात एका हायवा चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने व थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला.

मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ साधारण वीस ते पंचवीस वर्षे असतील असा अंदाज आहे. घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आल्याने ते परीक्षा देण्यासाठी जात होते असा अंदाज वर्तवला आहे.

घटनेनंतर माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत गर्दी केली. माहिती समजताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हायवा ट्रकचा शोध सुरु केला होता.

घटनास्थळाची भयावह स्थिती पाहून नागरिकांमधून अत्यंत शोक व्यक्त केला जात होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून तपासाअंती अधिक माहिती समोर येईल.

Ahmednagarlive24 Office