राहुरी :- तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात वनिवभागाला यश आले. सोशल डिस्टनसिंगची मर्यादा पाळून उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत राहुरी वनविभागाच्या या कामगिरीचे स्वागत केले.
पिंपळगाव फुणगी येथील मच्छिंद्र रामभाऊ बाचकर यांच्या शेतीतील गट नंबर ९६ मधील विहिरीत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्षाच्या शोधात आलेला दीड वर्षाचा नर बिबट्या बुधवारी रात्री या विहिरीत पडला.
गुरुवारी पहाटे परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या पाण्यात पाइपला धरून बसलेला दिसून आला. विहिरीत पाण्याचा साठा मोठा असल्याने काहीकाळ बिबट्याने मोटरपंपाच्या पाइपला धरून आपल्या सुरक्षेची काळजी घेतली.
याबाबत पिंपळगाव फुणगी येथील निखिल जगताप यांनी राहुरी वनविभागाला खबर दिल्याने सहायक वनसंरक्षक आर. जी. देवखिळे, राहुरीचे वनक्षेत्रपाल एम. बी. पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी. एन. लोंढे, वनपाल सचिन गायकवाड, वनरक्षक समाधान चव्हाण, वन कर्मचारी लक्ष्मण किनकर यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला विहिरी बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरखंडाला पिंजरा बांधून विहिरीत सोडल्यानंतर दीड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. रात्रभर पाण्यात असल्याने बिबट्याची अवस्था अस्वस्थ झाली होती.
पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या या बिबट्याला गुरुवारी दुपारी राहुरी वनविभागाच्या डिग्रस नर्सरीत आणण्यात आले. या ठिकाणी बिबट्याच्या आरोग्याची तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानंतर या बिबट्याला नैसर्गिक आदिवासात मुक्त केले जाणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®