अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- आजवर आपण एखादी चांगली दूध देणारी म्हैस दीड ते दोन लाखाला अथवा १ लाख रुपयांना गाय विकली गेल्याचे ऐकले वा पाहिले होते. मात्र शेळी…. आणि ती देखील दीड लाख रुपये! ही एका शेळीची किंमत आहे.
ती ऐकून तुम्ही सुद्धा चकित झाले असाल, परंतु हे सत्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याची बोर जातीची एक शेळी चक्क १ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विकली गेली आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक शेळी पालनाचा (गोट फार्म) व्यवसाय आहे. त्यांची एका शेळीची आज विक्री झाली. फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी आज भेंडा येथे येऊन शेळी खरेदी केली.
त्यांनी या एकाच शेळीसाठी तब्बल दीड लाख रुपये मोजले आहेत.एकच शेळी तब्बल दीड लाख रुपयांना विकल्यामुळे या शेळीची या भागात चांगलीच चर्चा केली जात आहे.