अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विखे-पाटील पिता-पूत्रांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. त्याबाबत पक्षाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकण्यासाठी ही पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे नेते विजय पुराणिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत. पक्षाने आम्हा सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. याची गांभीर्याने दखल घेतली गेली आहे.
प्रदेश कार्यकारिणीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विधानसभा निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली. पक्षाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत.
आम्ही मांडलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तर यावर जो काही निर्णय घ्यायचा ते घेतील. स्वतंत्र व्यवस्थेद्वारे चौकशी होऊन कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.