महाराष्ट्र

Pune Crime News : वय २४ अन् गुन्हे ५३ फरारी गुन्हेगाराला अटक ! पहा काय आहे त्याचे नाव

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune Crime News : पुणे शहर, पिंपरी- चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या व लुटमारीच्या तब्बल ५३ गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या अरमान प्रल्हाद नानावत या कुप्रसिद्ध गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी कोरेगाव भीमा परिसरात जेरबंद केले.

महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये वास्तव्य करून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या नानावतकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील, असा अंदाज आहे.

नानावत याच्याकडून हिंजवडी, सांगवी, तळेगाव दाभाडे, पौड, घोडेगाव, वडगाव मावळ, कामशेत, दिघी आणि शिक्रापूर परिसरातील चोऱ्या व लुटमारीचे ५३ गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. नानावत स्पोर्ट्स मोटारसायकल वापरतो.

चोऱ्या, लुटमारी करून मोटारसायकलीवरून तो इतर राज्यांत पसार होत असे. गुन्हे केल्यानंतर तो दूर अंतरावरील गावामध्ये दडी मारत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते.

परराज्यांमधील पोलिसांच्या मदतीनेही नानावत याचा तपास जारी केला होता. तो पुणे जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी व त्यांचे पथक गेल्या १३ दिवसांपासून त्याच्या मागावर होते.

संशयास्पद ठिकाणी पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. सध्या वेशातील पोलिसांचाही पहारा ठेवण्यात आला होता. नानावत कोरेगाव भीमा परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तपासासाठी त्याला येत्या १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office