पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी ( ता.जामखेड) हे गाव पर्यटनदृष्टया महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ लागले आहे. आज चोंडीचा विकास पुढील ५० – १०० वर्षाचा विचार करून पुर्णत्वाकडे जात आहे.
पुण्यश्लोक अहाल्यादेवी होळकर या आदर्श राज्यकर्त्या होत्या .त्या एक महिला असूनही त्यांनी चांगला राज्यकारभार केला. त्या एक उत्तम प्रशासक होत्या.
त्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी या उद्देशातून सन १९९५ मध्ये राज्यात नव्यानेच सत्तेत आलेल्या भाजपा – शिवसेना युती सरकारने अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडीचा विकास करण्याचा निर्णय घेवून, त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली.
यासाठी प्रथमपासूनच परिश्रम घेणारे युती सरकारमधील राज्याचे तत्कालिन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी याप्रश्री नूसता पाठपुरावाच केला नाही , तर ते काम पुर्ण करण्यासाठी स्वताला वाहून घेतले.त्यावेळी डांगे यांना साथ मिळाली ती त्यावेळचे नवोदित कार्यकर्ते व आजचे जलसंधारणमंत्री प्रा राम शिंदे यांची.
चोंडीतील विकास कामे चांगली दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी साहजिकच शिंदे यांच्यावर येवून पडली. ज्या कामाचा पाया अण्णा डांगे यांनी घातला, त्या कामावर कळस रचण्याचे काम जलसंधारणमंत्री शिंदे यांच्याकडून होत आहे. हा मोठा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल.
२५ ऑगस्ट १९९५ रोजी राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त चोंडीत कार्यक्रम झाला.याच कार्यक्रमात चोंडीत विविध विकास कामांचा शुभारंभ झाला.
यावेळी मुख्यमंत्री जोशी यांनी चोंडी विकासासाठी तब्बल दोन कोटी रूपयांची घोषणा केली. यासाठी चोंडी विकास आराखडा तयार करून , नियोजनबध्द विकासकामे करण्यास सुरूवात झाली.
यामध्ये अहिल्यादेवींचे जन्मघर गढीची पुर्नबांधणी, अहिल्येश्वर , महादेव मंदिर, चौडेश्वरी मंदिर, हनुमान मंदिरांचा जिर्णोध्दार,सभागृह ,सीना नदीवर पुल, विश्रामगृह , चापडगाव येथे प्रवेशव्दार ,स्मृतीस्तंभ, नक्षत्र उद्यान,सीना नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा,याच बंधा-यात कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय अशी कामे त्यावेळी झाली.
त्यानंतरच्या काळात पर्यटनमंत्रीपदी काम करताना विजयसिंह मोहिते यांनी अकलूज येथील शिवसृष्टीच्या धर्तीवर चोंडी येथे अहिल्या शिल्पसृष्टी निर्माण करण्यासाठी निधी देवून हे काम पुर्ण झाले. जन्मघर गढीचे पुर्णपणे जून्या पध्दतीने बांधकाम करण्यात आले आहे.
स्मृतीस्तंभ परिसरात नक्षत्र उद्यान उभारण्यात आले असून, याठिकाणी विविध प्रकारची वनौषधी व दुर्मिळ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आज चोंडीत गावांतर्गत १० मीटर रूंदीचे पक्के डांबरी रस्ते, अंडरग्राऊड गटार , फुटपाथ यांच्यासह चोंडीला जोडणारे बहुतांश सर्वच रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे चोंडीत अहिल्यादेवींच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कायम मान्यवरांचा राबता असतो. यातील अनेक मान्यवर हेलिकाफ्टरने येत असतात. या पार्श्वभूमीवर चोंडीत कायमस्वरूपी सर्व सोयींनी युक्त हेलिपॅड उभारण्यात आले आहे.गेल्यावर्षी ३१ मे २०१८ रोजी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हेलिपॅडचे उदघाटन झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडीत आजपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. ११ सप्टेबर १९९६ रोजी देशाचे तत्कालिन राष्ट्रपती दिवंगत डाॅ.शंकरदयाळ शर्मा यांनी चोडीला भेट दिली होती.
त्याचबरोबर ११ सप्टेबर २०१२ रोजी तत्कालिन केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी , ३१ मे २०१४ रोजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंढे यांनी भेट दिली. त्यांची ही शेवटचीच चोंडी भेट ठरली.
त्यापुर्वी मुंढे यांनी २५ ऑगस्ट १९९५ रोजी व ११सप्टेबर १९९६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून चोंडीला भेट दिली होती . यापुर्वी ३१ मे २०१२ व ३१ मे २०१३ असे सलग दोन वर्ष जयंती निमित्त मुंढे यांनी चोंडीला भेट दिली.
३१ मे २००१ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी चोंडीला भेट दिली. पंकजा मुंढे यांच्या पुन्हा संघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी १९ सप्टेबर २०१४ रोजी भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह चोंडीला भेट दिली.
फडणवीस यांनी यापुर्वी ३१ मे २०१४ रोजी गोपीनाथ मुंढें यांचेबरोबर चोंडीला भेट दिली होती. तर गेल्यावर्षी ३१मे २०१७ रोजी केंद्रिय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी व २०१८ ला जयंतीनिमित्त लोकसभा सभापती सुमित्रा महाजण यांनी चोंडीला भेट दिली होती.
याबरोबरच सन १९९७ मध्ये राज्याचे तत्कालिन बांधकाम मंत्री नितीन गडकरी, दिवंगत आर आर पाटील , दिवंगत गोविंदराव आदिक, दिवंगत शिवाजीराव शेंडगे ,राधाकृष्ण विखे, अजित पवार , खा.सुप्रिया सुळे , एकनाथ खडसे, विजयसिंह मोहिते, रामदास आठवले ,जयंत पाटील , राजू शेट्टी यांनी भेटी दिल्या आहेत.
चोंडीच्या जडणघडणीत अण्णा डांगेंचे योगदान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चोंडीचा विकास करण्याचा चंग बांधला तो अण्णा डांगे यांनी.
सन १९९५ मध्ये राज्यात युती सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री असलेल्या डांगे यांनी चोंडीच्या विकास कामांची त्यावेळी मुहर्तमेढ रोवली.
आज वयाच्या ८५ व्या वर्षी घरदार सोडून चोंडीतील विकास कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी चोंडीत तळ ठोकून आहेत. एखाद्या कामाचा ध्यास घेवून ते काम तडीस नेण्यासाठी अविरत कार्यरत राहण्याची किमया डांगे यांनी निभावली आहे.
महादेव जानकरांच्या रासपा ची स्थापना चोंडीत
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी प्रारंभीच्या काळात यशवंतसेनेच्या माध्यमातून चोंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला.
३१ मे १९९६ रोजी जानकर यांनी चोंडीत पहिली जयंती साजरी केली. त्यावेळी केवळ २०० लोकांच्या उपस्थित सूरू केलेला जयंती कार्यक्रम पुढे वाढत जावून हीच उपस्थिती २० हजाराच्या पुढे गेली.
जानकर यांनी १९९६ ला जयंती कार्यक्रम चोंडीत घेण्यास सूरूवात केल्यानंतर सन २०१५ ला जानकर यांनी साजरा केलेला चोंडीतील जयंती कार्यक्रम शेवटचा ठरला.
यादरम्यान जानकर यांनी सन २००३ साली जयंतीनिमित्त चोंडीत राष्ट्रीय समाज पार्टीची स्थापना केली.चोंडीत तब्बल २० वर्ष जयंती कार्यक्रम आयोजित केल्यानंतर
सन २०१६ पासून जानकर यांनी मुंबईत आझाद मैदानावर जयंती कार्यक्रम घेण्यास सूरूवात केली. याच वर्षापासून जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी चोंडीत जयंती कार्यक्रम आयोजित करण्यास प्रारंभ केला.
मंत्री प्रा.राम शिंदेचा उदय !
एम.एस्सी.बी.एड. शिक्षण घेतलेले प्रा.राम शिंदे हे आष्टी ( जिल्हा – बीड) येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होती.दरम्यान २५ ऑगस्ट १९९५ रोजी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त तत्कालिन मंत्री अण्णा डांगे यांच्या संपर्कात आले.
डांगे यांना चोंडी विकास कामे चांगल्या पध्दतीने करण्यासाठी एका चांगल्या सुशिक्षित तरूणाची गरज होती.प्रा.शिंदे यांच्यातील नेतृत्वगूण ओळखून डांगे यांनी चोंडी विकास कामांची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीचा राजीनामा देवून, चोंडी कामासाठी सक्रीय होण्यास सांगितले.
डांगे यांची सूचना शिरसांवध मानून प्रा,शिंदे यांनी चोंडीतील विकास कामांची जबाबदारी सांभाळली.हे काम करताना गेल्या २४ वर्षात प्रा.शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
राजकारणात कायम चढता आलेख असलेला त्यांचा राजकीय प्रवास प्रा.शिंदे यांना चोंडीचे सरपंचपदी, जामखेड पंचायत समिती सभापतीपदी , आमदारपदी व पुढे राज्यमंत्री व कॅबीनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे.