अहमदनगर ब्रेकिंग : दोन कोटींसाठी मुलींचे अपहरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- गुजरखेडे (ता.येवला) येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अज्ञात आरोपींनी रविवारी अपहरण केले. त्यांना सुखरूप सोडून देण्यासाठी मुलीच्या वडिलांकडे आरोपींनी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अपहरणकर्त्यांनी मुलींना ठार मारण्याची धमकी दिली.

या अपहरणकर्त्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला तालुका पोलिसांच्या मदतीने २४ तासांत शिताफीने पकडून अपहरण झालेल्या दोघी मुलींना सुखरुपपणे सोडविले.

संबंधित आरोपींविरोधात येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या मुलींचे पालक मोलमजुरी करतात. असे असताना इतकी मोठी रक्कम त्यांच्याकडे आरोपींनी मागितलीच कशी, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपहरण झालेल्या दोघींपैकी मोठी बहीण ही १७ वर्षांची तर लहान १५ वर्षांची असून, गुजरखेडे (ता.येवला) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार येवला पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली.

अवघ्या काही तासांतच मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत राहुल विजय पवार (वय २०, रा. नवसारी गाव, मनमाड), रोहित किशोर लोहिया (वय २१, रा. शंकरनगर, पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) व पूजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी राहुल पवार याने रविवारी रात्री मुलींना काहीतरी आमिष दाखवून अपहरण केले होते. पवार याने त्यांना दुसरा संशयित आरोपी दिनेश राजेंद्र सोळसे याच्याकडे पोहेगाव येथे ठेवले होते. राहुल पवारने मुलींच्या वडिलांना फोन करत रोहितला फोनवर बोलायला लावून मुलींच्या वडिलांकडे तब्बल २ कोटींची खंडणी मागितली होती.

ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाई केली.

पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ मुलींच्या शोधासाठी एक पथक कोपरगाव व शिर्डी येथे रवाना केले. सोमवारी रात्री उशिरा शिर्डी येथे बसस्थानक परिसरात सापळा रचून काही आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली.

पकडलेल्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अपहरण केलेल्या मुलींना डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब सोमवारी मध्यरात्री पोहेगाव, ता. कोपरगाव रोडवरील तळेगाव शिवारातून मुलींची सुखरुप सुटका करीत उर्वरित सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24