अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून सभापतिपदासाठी इच्छूक असलेले भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या प्रवेशानंतर लगेच त्यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत गेला असला तरी हा धक्का भाजपला का शिवसेनेला, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नगरसेवक मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

आता शिवसेना कोतकर यांच्या विरोधात फॉर्म दाखल करणार का? भाजपही नेमकी काय भूमिका घेणार? या प्रश्‍नांची उत्तरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मिळणार आहेत.

सभापतिपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक आहेत. ते आमदार जगताप यांचेही विश्‍वासू समजले जातात. शिवसेनेकडून विजय पठारे, श्‍याम नळकांडे यांची नाव चर्चेत आहे.

सभापतिपदासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते महाविकास आघाडीतील नेत्यांना साकडे घालत आहेत. त्यामुळे जगताप मित्रत्वाला जागतात, महाविकास आघाडीचा धर्म पाळतात, की आणखी काही वेगळा निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महापौर व विरोधी पक्षनेतेपद सावेडीत आहे; मात्र स्थायीचे सभापतिपद केडगावला मिळण्याची शक्‍यता आहे. पुन्हा नगरमुळे लक्ष्यवेध राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने त्यांचा त्यांचा उमेदवार रिंगणात उतरविल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो.

भाजपची काँग्रेस, बसपा आणि इतर मतदारांवर भिस्त आहे. भाजपचा सभापती झाल्यास महाविकास आघाडीत पुन्हा राज्यपातळीवरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24