अहमदनगर ब्रेकिंग : प्रेयसीला शिवीगाळ केल्याच्या रागातून वृद्धेचा खून करणारा’तो’ प्रियकर व प्रेयसीस अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- आठ दिवसांपूर्वी  भरदुपारी संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे झालेल्या वृद्धेच्या खूनाचा उलगडा आहे. या प्रकरणी आरोपीला थेट जालना जिल्ह्यातून अटक करून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१९ जानेवारी रोजी तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारातील सावित्राबाई मोगल शेळके (वय ६५) या वृद्ध महिलेचा अंगावरील दागिन्यांसाठी खून झाल्याचे समोर आले होते. याच दरम्यान या वृद्धेच्या गोळ्या-बिस्किटाच्या छोटेखानी दुकानात खाऊ घेण्यासाठी आलेल्या एका चार वर्षीय मुलीच्या कानातील बाळ्या अक्षरशः ओरबाडून घेत चोरटा पसार झाला होता.

या घटनेनंतर तालुका पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे व उपअधीक्षक राहुल मदने यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला दिशा देण्याचे काम केले. तर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनीही या गुन्ह्याचे पैलू हुडकण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्यांचा परिणाम कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसतांनाही पोलिसांनी केवळ गुन्हेगारच नव्हे तर त्यामागील संपूर्ण घटनाक्रमच उलगडून समोर आणला. मयत वृद्ध महिला १८ जानेवारी रोजी तिची आतेसून ( रा.फत्तेबाद, श्रीरामपूर हल्ली मंठा, ता.जालना) हिच्याकडे गेली होती. यावेळी दोघींमध्ये काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले.

त्यातून संबंधित वृद्धेने तिला मारहाण व शिवीगाळ केली. त्या रागाच्या भरातच ती वृद्धा तेथून संगमनेरला निघून आली. या सगळ्या प्रकाराचा राग आल्याने तिने सदरची घटना आपला प्रियकर भाऊसाहेब उर्फ भावड्या झुंबर येलमामे (वय ३०, रा.मिरपूर, ता.संगमनेर) याला सांगून म्हातारीचा बेत बघण्यास सांगीतले.

या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी संशयित आरोपी भाऊसाहेब येलमामे कौठे कमळेश्वरमध्ये आला व त्याने ठरल्याप्रमाणे आपल्या प्रेयसीच्या अपमानाचा बदला म्हणून थेट त्या वृद्धेचा जीवच घेतला, हा प्रकार चोरी अथवा दरोड्याचा भासवण्याचाही पुर्ण प्रयत्न झाला. मात्र तो पोलिसांना फारकाळ अंधारात ठेवू शकला नाही.

त्या लहान मुलीकडून केवळ काळा शर्ट घातलेला माणूस इतकीच तोकडी माहिती पोलिसांकडे होती. त्या आधारावर पोलिसांनी अवघ्या आठच दिवसांत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात छापा घालीत खून करणारा प्रियकर आणि तसे करायला सांगणारी प्रेयसी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24