अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खासगी बस व डंपरचा भीषण अपघात होऊन डंपरनं पेट घेतल्यानं त्यात बसलेल्या एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर बसचालकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथे घडला.
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कामानीजवळ नगरकडून औरंगाबादकडे जाणाया खासगी बसने (क्रमांक जी.जे.-१४, झेड-८५८५) डंपरला (विना नंबर) धडक दिली.
या अपघातात डंपरची डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला. दरम्यान डंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय २७, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हा या अपघातात डंपरमध्येच जळून मयत झाला.
व चालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातात डंपर जळून खाक झाला आहे. तर खासगी बसचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
Web Title – Ahmednagar Breaking: One dies in horrific accident