अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी प्रा. सुधीर तुकाराम तांबे (वय ३१) यांचा श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले अन्य दोन शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रा. सुधीर तांबे, त्यांचे दोन सहकारी प्रा. डी. पी. मुळीक व प्रा. एन. ए. पवार हे बुधवारी (दि. २५) नातेवाईकाचा दशक्रियाविधी कार्यक्रम आटोपून दुपारच्या सुमारास आपल्या चारचाकी (क्र. एमएच १७ एझेड ६२६५) वाहनाने श्रीगोंदा-अहमदनगर रस्त्यावरून प्रवास करीत होते.
यावेळी बेलवंडी शिवारात अज्ञात वाहनाने त्यांना हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. यामध्ये प्रा. सुधीर तांबे हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे दोन सहकारी प्रा. डी. पी. मुळीक व प्रा. एन. ए. पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा प्रा. सुधीर तांबे यांच्यावर शोकाकूल वातावरणात चिंचपूर येथे अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राहाता, संगमनेर तसेच प्रवरा परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. तांबे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, चुलते, असा मोठा परिवार आहे. चिंचपूर बुद्रुकचे पोलीस पाटील दत्तात्रय तांबे यांचे ते पुतणे होते.