अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा संशयास्पद मृत्यू,अर्धवट पाय खाल्लेला अवस्थेत मृतदेह आढळला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर शहरानजीक असणार्‍या समनापूर शिवारात म्हसोबा मंदिरानजीकच्या शेतात एका 60 वर्षीय इसमाचा डावा पाय अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निवृत्ती विष्णू गुंजाळ (वय ६०, राहणार कोळेवाडी रोड, सुकेवाडी) या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता गणपती मंदिराजवळील पुणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यालगत समनापूर शिवारात उघडकीस आली.

या संदर्भात शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची चर्चा असली, तरी वनविभागाकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही. मृताजवळ कीटकनाशकची बाटली मिळाल्याने व मृतदेह २ मीटरपर्यंत ओढत नेण्यात आल्याने वनविभागाचे अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

समनापूर शिवारातील बाह्यवळण रस्त्यालगत दत्तात्रय आनंदा गुंजाळ यांचे सर्वे नंबर ११८ क्षेत्र आहे. त्यांच्या मक्याच्या शेतात सोमवारी सकाळी निवृत्ती गुंजाळ मृतावस्थेत आढळले. मृतदेहाचा डावा पाय गुढघ्याच्या खाली खाल्लेला होता. डाव्या हाताची दोन बोटेदेखील तुटलेली होती. दुसऱ्या पायाला ओरखडलेले दिसत होते. या वृद्धावर बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

या घटनेची माहिती निंभाळे येथील कैलास पर्बत यांनी वनविभागाला कळवली. उपविभागीय वनअधिकारी ए. टी. तोरडमल, वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल ए. एम. मेहेत्रे, पी. जे. पुंड, एस. एम. पारधी, वाय. आर. डोंगरे आदी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह त्यांनी शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात हलवला.

या वृद्धावर बिबट्यानेच हल्ला केला असावा, असा अंदाज प्रथम वर्तवण्यात आला. मात्र, मृतदेहाजवळ हमला ५५० या कीटकनाशकची रिकामी बाटली व पाण्याची बाटली आढळून आली. दोन मीटर अंतरावरून मृतदेह फरफटत नेला असल्याचे दिसून आले. मृत निवृत्ती गुंजाळ यांच्या पायाव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही जखम आढळून आली नाही.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याने हल्ला केला असता, तर प्रथम मानेवर किंवा गळ्यावर केला असता. तसे काही आढळून आले नाही. काही अंतरावर मृताच्या तोंडातील फेस आढळला. कपडेही कुठेही फाटलेले दिसून आले नाही. काही अंतरावर बाह्यवळण रस्त्यालगत मृताची हीरो होंडा मोटारसायकल (एमएच १७ एएस १८२२) मिळाली. सोमवारी दिवसभर याच घटनेची चर्चा शहर व तालुक्यात सुरू होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title –  Ahmednagar Breaking: Suspected death of old man, half-legged dead body found!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24