अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेच्या स्वच्छता विभागातील दोन कर्मचार्यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून बंद पडलेले अत्यावश्यक सेवेचे काम शनिवारी दुपारपासून सुरू झाले.
महापालिका कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलन मागे घेत असताना संबंधित नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
महापालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी सुरेश वाघ व अविनाश हंस यांना बुधवारी मध्यरात्री नागापूर परिसरात मारहाण झाली होती. जंतुनाशक फवारणीसाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका रिटा भाकरे यांचे नातेवाईक असलेले नीलेश भाकरे यांच्यासह सात-आठ जणांनी त्यांना गज, काठ्यांनी मारहाण केली होती.
यातील वाघ यांना गंभीर इजा झाली होती. दोघांनाही खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका करणार आहे. तसे आश्वासन आयुक्त मायकलवार यांनी मनपा कर्मचारी युनियनला दिले आहे.
मारहाणीतील प्रमुख आरोपी व त्याचे साथीदार फरार असून, त्यांना तातडीने अटक करावी, भाकरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, फवारणीचे दिवसाच करण्यात यावी, ती करताना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या युनियनने केल्या होत्या.
भाकरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पाठविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच फवारणीचे काम दिवसा आणि पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com