अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावरील आष्टी तालुक्यातील पोखरीजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गुरूवारी मध्यरात्री कार झाडावर आदळून खड्ड्यात कोसळली. या अपघातात जामखेड येथील आडत व्यापारी विशाल ऊर्फ बंटी काकासाहेब पवार (वय ३०) जागीच ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
पवार यांच्यामागे आई, पत्नी, लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. तालुक्यातील पाडळी येथे शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाश अभिमन्यू उगले (जामखेड) व पवन गायकवाड (जातेगाव) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना तातडीने नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
विशाल पवार यांचे जामखेड येथे आडत दुकान आहे. आपल्या दोन मित्रांसमवेत गुरुवारी दुपारी ते आष्टी तालुक्यात सोयाबीनची गाडी भरण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरच्यांच्या संपर्कात होते. मध्यरात्री जामखेडकडे येत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळून पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
इतर दोघे गंभीर जखमी झाले. कार झाडाझुडपांत पडल्याने हा अपघात झाल्याचे रात्री कोणाच्या लक्षात आले नाही. पहाटे पाचच्या सुमारास पोखरी परिसरातील काही तरूण व्यायामासाठी या रस्त्याने जात असताना त्यांना गाडी दिसली.
घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले. आष्टीहून १०८ रूग्णवाहिकेतून या अपघातातील जखमींना जामखेड येथे आणण्यात आले. मृतदेहाचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.