अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीत दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
दि.१५ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास (यूपी ७७ एएन ८७९१) हा ट्रक राहुरीकडून नगरकडे जात होता. याच वेळी (एमएच ०४ जेके ६५८४) हा ट्रक नगरकडून राहुरीकडे येत होता.
नगर- मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीतील धरमाडी टेकडी परिसरात नगरकडून राहुरीकडे येत असलेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि तो ट्रक रस्ता दुभाजक तोडून विरूद्ध रस्त्यावर आला.
यावेळी समोरून आलेल्या ट्रकला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला. दोन्ही ट्रकचे चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी झालेल्या दोन्ही चालकांना तातडीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. घटनेनंतर नगर- मनमाड राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.