अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला. हा नवा स्ट्रेन अंत्यत घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्यामुळे कोरोनाचा पुढील कोणताही धोका नको म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
नवीन करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 39 जण इंग्लंडहून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नगरमध्ये काल गुरूवारी 13 तर आज शुक्रवारी आणखी 26 जण आल्याचे आढळून आले आहे.
नगरमध्ये एकूण 39 जण इंग्लंडहून आल्याने नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे परदेशातून आलेले सर्वाधिक 30 जण हे नगर शहराच्या विविध भागात पोहचले आहेत.
गुरूवारी नगरमध्ये 13 जण इंग्लंडहून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यात नगरमध्ये 11 तर श्रीगोंदा व संगमनेरचा प्रत्येकी एक प्रवासी होता. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला पुन्हा नव्याने 26 जणांची नावे मिळाली आहेत.
त्यातील सर्वाधिक 20 प्रवासी हे नगर शहरातील असून जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंदा, संगमनेरमधील प्रत्येकी एक तर पारनेरमध्ये दोघांचा समावेश आहे.
नगर शहरातील शिवाजीनगर, कराचीवालानगर, पाईपलाईन रोड, सावेडीतील निरंजन कॉलनी आणि अमित बँक कॉलनी तसेच टीव्ही सेंटर भागात हे प्रवासी आहेत.
या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येणार असून या चाचणीमध्ये जर कोणी बाधित आढळले तर त्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळा येथे पाठविले जातील.
तपासणीत ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांचा नियमानुसार पुढील २८ दिवस पाठपुरावा केला जाईल. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येणार आहे.