अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरजवंतांना सवलतीच्या दरात शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगर जिल्ह्याने या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आघाडी घेतली असून, राज्यातील पहिली शिवभोजन केंद्रे नगरमध्येच सोमवारी मंजूर झाली आहेत.
या शिवभोजन केंद्र चालकांचा प्रदीर्घ प्रशिक्षण वर्ग काल मंगळवार रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागात संपन्न झाला. यावेळी केंद्र चालकांना शिवभोजन योजनेचा हेतू विशद करीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी अर्थात एक जानेवारी रोजी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शिवभोजन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला. योजनेची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन, नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांनी राज्यभरातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
या योजनेसाठी गठीत असलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. तर सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शिवभोजनसंदर्भात गतिमान पाठपुरावा केला. नगर शहरात पाच ठिकाणी शिवभोजन केंद्रांना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सोमवार दि. १३ रोजी सायंकाळी मंजुरी दिली.
येत्या २६ जानेवारी रोजी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रांचे विधिवत उद्घाटन होणार आहे. मंजुरी प्रदान केल्यानंतर जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात केंद्र चालकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
योजनेची माहिती, हेतू आणि नियमांविषयी केंद्र चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा विभागातील नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, पुरवठा निरीक्षक विजय उमाप, जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाचे डॉ. दादासाहेब साळुंके, डॉ. विक्रम म्हसे, कर निर्धारक किशोर देशमुख, जी. एस. झिने, यू. एच. चैनपुरे,वाहिद मनियार, आयटीआयच्या प्रतिनिधी श्रीमती एस.पी. देशमुख, सहायक कामगार आयुक्तांचे प्रतिनिधी सी. ए. शिंदे या अधिकाऱ्यांनी केंद्र चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, गरजवंताला दर्जेदार अन्न मिळावे, या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाकांक्षी स्वरूपात शिवभोजन योजना कार्यान्वित केली आहे. केंद्रातील सुविधेची वेळोवेळी प्रशासन मार्फत तपासणी केली जाणार आहे. योग्य काम करणारांचा प्रशासन सन्मान करील. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाईल. असा इशारा योजना समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला.