अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020 : महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर कर्मचारी युनियनने काम बंद केले. जोपर्यंत पर्यायी इमारत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम बंदच राहील. प्रशासनाने प्रतिबंधात्मक साधने न पुरवल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला.
संपूर्ण शहरात कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनाच बाधा झाली. आतापर्यंत मनपा मुख्यालयात एका अधिकाऱ्यासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे निदान झाले.
या पार्श्वभूमीवर लोखंडे यांनी सोमवारी अचानकच बंदचे हत्यार उपसले. त्यामुळे मुख्यालयात शुकशुकाट होता. मंगळवारी (१४ जुलै) मुख्यालय खुले होणार की नाही, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अधिकारी स्तरावरून देण्यात आले नाही.
लोखंडे म्हणाले, प्रशासनासमवेत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मनपाच्या इमारतीत कार्यरत कर्मचारीच बाधीत सापडले आहेत. त्यामुळे ही इमारत कंटेन्मेंट झोनच्या उंबरठ्यावर आहे. या इमारतीला प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.
औषध फवारणी केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. आम्हाला पर्यायी इमारत उपलब्ध करून द्या, तरच आम्ही काम करतो. मनपा प्रशासनाला, मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज वेळेवेर द्या अशी मागणी आम्ही करत होतो.
परंतु दोन महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर दिले नाही. मास्क नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या नर्सेस सर्वेक्षणासाठी जातात, त्यांच्याही हातात हँडग्लोज नाहीत, सफाई कामगारांकडे सुरक्षेसाठी साधने नाहीत, याला मनपा प्रशासन जबाबदार आहे. ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने दहा दिवसांची विश्रांती द्या, अशी मागणीही लोखंडे यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews